खाकी उतरवली पण, खादी रास नाही आली !! सिंघम शिवदीप लांडेंना पराभवाच्या छायेत...

Foto
पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सुरु असून जमालपुर आणि अररिया या दोन विधानसभा मतदारसंघांकडे महाराष्ट्राचेही डोळे लागले आहेत. याचं कारण म्हणजे या दोन्ही हायप्रोफाईल मतदारसंघांत बिहारचे सिंघम अशी ओळख असलेले धडाडीचे माजी आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे निवडणूक लढवत आहेत. शिवदीप लांडे हे राजकारणात पाऊल ठेवत अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मात्र खाकी सोडून खादी अंगावर चढवणाऱ्या लांडेंना मोठा धक्का बसला आहे. कारण अररिया आणि जमालपुर या दोन्ही मतदारसंघातून शिवदीप लांडे पिछाडीवर आहेत.

बिहार विधानसभा निवडणुकीत अररिया मतदारसंघात जदयूकडून शगुफ्ता आझीम रिंगणात आहेत. सहा फेऱ्यांनंतर त्यांनी 24 हजार 915 मते मिळवत मोठी आघाडी घेतली. दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेसचे अबिदुर रहमान 13 हजारांहून अधिक मतांनी पिछाडीवर आहेत. एमआयएम उमेदवार तिसऱ्या नंबरवर असून शिवदीप लांडे चौथ्या क्रमांकावर आहेत. तिथे त्यांना अवघी 734 मतं मिळाली आहेत.

 दुसरीकडे, जमालपूर मतदारसंघात जेडीयूने मोठी खेळी केली. एका माजी मंत्र्याचे तिकीट कापून नचिकेता मंडल यांना उमेदवारी दिली. तिकीट कापल्यामुळे संतप्त झालेल्या माजी मंत्र्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली. नचिकेता मंडल सहा फेऱ्यांनंतर 21 हजार मतांसह पहिल्या क्रमांकावर आहेत. तर इंडियन इन्क्लुजिव्ह पार्टीचे नरेंद्र कुमार 13 हजार मतांसह दुसऱ्या स्थानी आहेत. अपक्ष शैलेश कुमार तिसऱ्या क्रमांकावर आहेत, तर शिवदीप लांडे इथेही फक्त 1690 मतं जिंकत चौथ्या नंबरवर आहेत.

 कोण आहेत शिवदीप लांडे?

49 वर्षीय शिवदीप वामनराव लांडे यांचा जन्म अकोल्यातील. ते महाराष्ट्राचे सुपुत्र , तसे राजकीय घराण्याचे जावईही आहेत. त्यांचे सासरे म्हणजे शिवसेना नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे. शिवदीप लांडे हे 2006 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी 2024 मध्ये आयपीएस पदाचा राजीनामा दिला. याआधी त्यांनी बिहारमधील पूर्णिया येथील महानिरीक्षक म्हणून काम पाहिले. यापूर्वी त्यांनी तिरहुत विभाग कोसी विभागाचे उपमहानिरीक्षक आणि बिहारमधील अररिया, पूर्णिया आणि मुंगेर जिल्ह्यांमध्ये पोलिस अधीक्षक म्हणून काम पाहिले.